लाडकी बहिण योजना : 26 लाख महिला अपात्र; या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार नाही

लाडकी बहिण योजना : 26 लाख महिला अपात्र; या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार नाही

लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने निवडणूक पूर्वी सुरू केलेली एक महत्वाची योजना असून राज्यातील लाखो महिलांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमहा ₹1500 सन्माननिधी थेट जमा केला जात आहे. मात्र अलीकडेच या योजनेच्या लाभामध्ये गंभीर गैरव्यवहार समोर आला आहे.

१४,२९८ पुरुषांनी घेतला होता लाभ

या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या यादीत तब्बल १४,२९८ पुरुषांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार टीका केली. यानंतर या सर्व पुरुष लाभार्थ्यांना योजना लाभातून वगळण्यात आले आहे.

२६.३४ लाख महिलाही ठरल्या अपात्र

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध विभागांकडून माहिती घेतल्यानंतर सुमारे २६.३४ लाख महिला लाभार्थी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

पैसे कधीपासून थांबणार?

तपासणीत असे दिसून आले की, अनेक लाभार्थ्यांनी एकाहून अधिक योजनांचा लाभ घेतला आहे, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला आहे, तर काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज केल्याचे आढळले आहे. त्यामुळे या सर्व माहितीच्या आधारावर जून २०२५ पासून या २६.३४ लाख लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

अजून किती महिलांना मिळतोय लाभ?

जरी या योजनेतून २६.३४ लाख महिला अपात्र ठरल्या असल्या, तरी योजनेच्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थ्यांना जून २०२५ चे मानधन वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे बहुसंख्य महिलांना सन्माननिधी मिळणं सुरूच आहे.

अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळणार का?

तात्पुरते लाभ थांबवलेल्या २६.३४ लाख अर्जांची जिल्हाधिकारी पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतर जे अर्जदार पात्र ठरतील, त्यांचा लाभ शासनाकडून पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई?

चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment